Thursday, 4 September 2014

अल्फाबेटायझर वेब अॅपगाव म्हंटलं की वीजेचं लोड शेडींग आणि डिजिटल डिव्हाईडचा विषय हे खास चर्चेचे विषय. वीज नसेल तर तुमचं इंटरनेट चालायचं कसं? किंवा, इंटरनेट लाख पोचलं हो, पण आमच्या अंगठाबहादूरांना ते कसं कळायचं आणि त्यांना ते कुणी शिकवायचं? वगैरे प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतात. मोबाईल फोनवरचा एसएमएस वाचता यावा म्हणून तरी शिकायला हवं हे नव्या पिढीला कळतं. नोकरीचा कॉल पोस्टापेक्षा ईमेलवरून पटकन मिळतो म्हणून तरी ते तंत्र आपल्याला माहित असायला हवं हे तरूणाईने आता स्वीकारलं आहे. शासकीय कार्यालयापासून ते औषधाच्या साध्या दुकानापर्यंत कुठेही माणूस नेमायचा झाला तर त्याला इंटरनेटचं तंत्र माहीत असायला हवं याला आता महत्व प्राप्त झालं आहे. सात बाराच्या उतार्‍यापासून ते शासनाचा जीआर शोधण्यासाठीही इंटरनेटची सेवा आता जीवनावश्यक भाग बनते आहे. 
       एकीकडे अशा इंटरनेटवर आधारलेल्या सुविधा वाढत आहेत आणि दुसरीकडे इंटरनेटवर शेकड्याच्या संख्येने अत्यंत उपयुक्त अशी वेब अॅप्स उपलब्ध होत आहेत. यातली शेकडो वेब अॅप्स किंवा वेब अप्लीकेशन्स मोफत उपलब्ध आहेत. घर असो की एखादी संस्था, खाजगी उद्योग असो की मोठे शासकीय कार्यालय ही वेब अप्लीकेशन्स वेळ वाचवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. एखादे नाविन्यपूर्ण, फारसे माहित नसलेले व कमालीचे वेब अप्लीकेशन कुठे आढळले की एंटर सदरासाठी मला तो विषय खुणावतो. असंच एक अत्यंत गुणी आणि मोफत उपलब्ध असणारं वेब अप्लीकेशन किंवा वेब अॅप म्हणजे अल्फाबेटायझर. ते उपलब्ध आहे http://alphabetizer.flap.tv/ ह्या पत्त्यावर. 
       अल्फाबेटायझर ह्या नावातच खरं तर त्याचा उपयोग आलेला आहे. एखादी मोठी यादी आपल्याला अकारविल्हे लावायची असेल तर ते कितीतरी जिकीरीचं काम. कित्येकदा त्यासाठी काही तास खर्ची पडतात, आणि तेवढा वेळ देऊनही त्यात काही चुका राहून जाण्याची शक्यता असते. आपण एक उदाहरण घेऊ. एका शाळेत पाचशे मुले आहेत. ह्या मुलांची नावे हजेरीपटात काही विशिष्ट क्रमाने नाहीत. नावे असोत की आडनावे पण त्यातलं काहीही अकारविल्हे नाही. त्यामुळे एखादा मुलगा शोधायचा झाला तर प्रत्येक नावावरून बोट फिरवत जाऊन आणि पानांमागे पाने उलटून ते विशिष्ट नाव शोधणं हे क्रमप्राप्त होतं. ही सारी पाचशे नावं अकारविल्हे लावायची तर संगणकाची मदत निश्चितच होऊ शकते. सर्वांना माहीत असलेल्या एक्सेल प्रोग्राममध्ये सर्व नावे टाईप केली तर एका क्षणात त्याची अल्फाबेटीकल किंवा अकारविल्हे यादी आपल्याला मिळू शकते. पण त्यासाठी एक्सेलची माहिती असणारी व्यक्ती उपलब्ध हवी. तशी उपलब्धता नसेल तर हे अल्फाबेटायझर नावाचं वेब अप्लीकेशन हमखास मदतीला येतं. 
  
वेब अप्लीकेशनचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. कसलही इन्स्टॉलेशन किंवा किचकट सेटींग/कन्फीगरेशन वगैरेंची गरज नाही. फक्त इंटरनेट चालू करायचं, त्या विशिष्ट वेब साईटवर जायचं आणि आपलं काम सुरू करायचं. आता अल्फाबेटायझरचच पहा. त्या वेब साईटवर गेलात की समोर एक तळहाताएवढा कोरा भाग दिसतो. ह्या कोर्‍या भागात आपल्याला हवी ती यादी टाईप करीत जायचं. तुम्ही मुद्दाम तो प्रयोग करा. आपल्याच घरातल्या दहा जणांची नावे त्यात टाईप करा. प्रत्येक नाव टाईप झालं की एंटर बटण दाबणं आवश्यक. नावं टाईप झाली की नंतर ALPHABETIZE ह्या बटणावर फक्त क्लीक करायचं. काही क्षणांत ती सर्व नावं अकारविल्हे म्हणजे इंग्रजी ए ते झेड ह्या क्रमाने लावून आपल्या पुढे येतात. आपल्या प्रिंटरवर आपण त्याची प्रिंट देखील घेऊ शकतो. हा झाला अल्फाबेटायझरचा मुलभूत उपयोग. पण त्याच बरोबर अल्फाबेटायझर आणखीही बरीच मदत आपल्याला करू शकतो. उदाहरणार्थ सर्व नावांच्या मागे क्रमांक टाकणं, नावांपुढे स्वल्पविराम किंवा एखादा विशिष्ट शब्द टाकणं वगैरे. अल्फाबेटायझर जशी अकारविल्हे यादी लावतो तशी ती उलट्या क्रमानेही लावू शकतो. उलटा क्रम म्हणजे अर्थातच झेड पासून ते ए पर्यंतची उलट्या क्रमाची यादी. 
      अल्फाबेटायझर हा खरं तर इंग्रजीसाठी आहे. पण मी सहज त्याची मराठीसाठी चाचणी घेतली. युनिकोड मराठी फाँटमध्ये त्यात मराठी नावे टाईप करून पाहिलं आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मराठी नावेही अ क ख ग घ ह्या क्रमाने अल्फाबेटाईज म्हणजे अकारविल्हे होऊ शकतात असं आढळलं. अपवाद दिसला तो क्ष आणि ज्ञ चा. क्ष म्हणजे त्याच्या दृष्टीने क+श होतो. ज्ञ म्हणजे ज+न होतो. त्यामुळे त्याचे शब्द एकत्र होऊन अनुक्रमे क आणि ज च्या जागी येतात. हे वेगळे आलेले शब्द आपण मॅन्युअली क्ष आणि ज्ञ च्या ठिकाणी टाकले तर काम चोख होऊ शकतं. त्यामुळे, एखाद्या पुस्तकातल्या किंवा कोशातल्या विविध प्रकरणांची, उपप्रकरणांची वगैरे अकारविल्हे सूची करायची असेल तर अल्फाबेटायझर अतिशय मोलाची मदत त्यासाठी करू शकेल. 
    अल्फाबेटायझर जसं 'अकारविल्हेवाटी' साठी उपयुक्त आहे, तसंच दुसरं  http://felix-cat.com/tools/wordcount/  ह्या पत्त्यावरील वेब अप्लीकेशन शब्द मोजण्यासाठी उपलब्ध आहे. खरं तर वर्ड किंवा ओपन ऑफिस सारख्या सॉफ्टवेअरमध्ये शब्द मोजण्याची व्यवस्था आहे. पण अचानक वा हे प्रोग्राम्स उपलब्ध नसताना केवळ इंटरनेटच्या उपयोगाने एखाद्या लिखाणातील शब्द मोजायचे झाले तर ह्या वेब अप्लीकेशनचा चांगला उपयोग होतो. ही दोन शब्दांशी संबंधित वेब अॅप्स आपण बुकमार्क करून ठेवायला काहीच हरकत नाही. अडीअडचणीतील त्यांची उपयुक्तता खरचं अपरिमित आहे. 

No comments:

Post a Comment