Wednesday, 3 September 2014

सुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर     अॅडोबी फोटोशॉप हे अजस्त्र ताकद असलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या भजनी तुम्ही एकदा लागलात की शिकता भुई थोडी होते. किंवा, फोटोशॉप शिकता शिकता पुरेवाट होते. ज्यांनी फोटोशॉप ह्या विषयावर हजारभर पानांची पुस्तके इंग्रजीत लिहीली आहेत असे अमेरिकन लेखकही आम्ही अजूनही फोटोशॉपचे विद्यार्थी आहोत, असं प्रस्तावनेत आवर्जुन लिहीतात. फोटोशी संबंधित काहीही काम निघालं की संबंधिताला आवर्जुन आठवण होते ती फोटोशॉप नामक सॉफ्टवेअरचीच. खरं तर फोटोशॉप मधला 'शॉप' हा शब्द कमालीच्या विनयाने आलेला आहे. ते शॉप म्हणजे दुकान नव्हेच, ते एक अतिप्रचंड सुपर मार्केट किंवा खरं तर तो फोटो मेगा मॉलचा प्रचंड असा कॉम्प्लेक्स आहे. आज तुम्ही फोटोशॉपची नवीन आवृत्ती म्हणजे सीएस-४ विकत घ्यायला गेलात तर त्याची अधिकृत किंमत आहे ६९९ डॉलर्स म्हणजे अदमासे ३४,००० रूपये. एवढी मोठी रक्कम टाकून फोटोशॉपची लायसन्स्ड कॉपी विकत घेणारे हे फोटो क्षेत्रातले पक्के व्यावसायिक किंवा मोठ्या संस्थाच असू शकतात. थोडक्यात, फोटो सॉफ्टवेअरच्या जगतातलं फोटोशॉप हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन साधा चहा घ्यायचा म्हंटला तरी दीड-दोनशे रूपये मोजायची तयारी असावी लागते. ज्यांची अशी तयारी नसते ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या नादी न लागता एखाद्या फास्ट फूड काऊंटरवर जाऊन आठ-दहा रूपयांत आपली चहाची तलफ भागवतात. असच एक फोटोशॉपसदृश्य फास्ट टूल काऊंटर म्हणजे इंटरनेटवरचं सुमोपेंट. 
    सुमोपेंट ह्या आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण नजर टाकूया अॅडोबी फोटोशॉपच्या गेल्या १८ वर्षांच्या वाटचालीकडे.. १९९० च्या फेब्रुवारीमध्ये फोटोशॉपची पहिली आवृत्ती म्हणजे व्हर्जन १.० आलं होतं. पुढे लगेचच काही महिन्यांनी २.० ही आवृत्ती आली. १९९४ साली ३.०, १९९६ साली ४.०, १९९८ साली ५.०, १९९९ मध्ये सुधारित ५.५, २००० मध्ये ६.०, २००१ मध्ये ७.० अशा वेगाने फोटोशॉप घोडदौड करत राहिलं. त्याची लोकप्रियता वाढत गेली. 


पुढे २००३ साली फोटोशॉप सीएस (म्हणजे ८.०), २००५ मध्ये सीएस२ (म्हणजे ९.०), २००७ मध्ये सीएस३ (म्हणजे १०.०) आणि २००८ सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सीएस४ (म्हणजे ११.०) ही सध्या ताजी असलेली फोटोशॉपची आवृत्ती आली. ज्यांनी २००७ साली म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी फोटोशॉपची सीएस३ ही तेव्हा नवीकोरी असणारी आवृत्ती अदमासे २०,००० रूपयांना अधिकृतपणे विकत घेतली होती, त्यांना आता सीएस४ चा अपग्रेड घेण्यासाठी सुमारे ९००० रूपये आणखी मोजावे लागतील. 
 
   वरच्या परिच्छेदात फोटोशॉपचा इतिहास भूगोल अशासाठी सांगितला की फोटोशॉपचा विकसित होण्याचा वेग प्रचंड आहे. जवळ जवळ दरवर्षी एक नवी आवृत्ती फोटोशॉपवाले आपल्यासमोर ठेवतायत. नवी आवृत्ती म्हणजे काहीतरी नवं त्यात असणार हे ओघानच आलं. ते नवं हवं असेल तर त्याची किंमत मोजणं हेही ओघानच आलं. ज्यांना ही किंमत मोजणं अवघड किंवा अशक्य आहे त्यांचेसाठी फोटोशॉपसारखं अधिकृतपणे मोफत उपलब्ध असणारं सॉफ्टवेअर म्हणजे गिंप. त्याची ताजी आवृत्ती म्हणजे २.६. फोटोशॉपच्या अकरा आवृत्त्यांपुढे गिंपच्या तीन आवृत्त्या हा वेग धीमा आहे हे खरच. गिंपला काही जण गरिबाचं फोटोशॉप असंही म्हणतात. ओपन सोर्स व अधिकृतपणे मोफत उपलब्ध असलेलं गिंप www.gimp.org ह्या साईटवरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल. गिंप फोटोशॉपच्या जवळ येण्याचा आणि स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतय हेही खरं, पण फोटोशॉपचा वेग महाप्रचंड आहे. तो मान्य करायलाच हवा

आपला आजचा मुख्य विषय म्हणजे सुमोपेंट. त्या विषयाच्या नमनाला फोटोशॉपसंबंधी घडाभर तेल ओतावं लागलं याला तसच कारण आहे. एक म्हणजे सुमोपेंट हे इंटरनेटवर अगदी अलिकडे उपलब्ध झालेलं मिनी फोटोशॉप म्हणता येईल असं ऑनलाईन टूल आहे. सुमोपेंट हे तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावं लागत नाही. ते इंटरनेटवर तयारच उपलब्ध असतं. तुम्ही इंटरनेटवर www.sumopaint.com/app ह्या साईटवर गेलात की तुमच्या पुढे हे मिनी फोटोशॉप दत्त म्हणून उभं राहतं. ते अधिकृतरित्या मोफत आहे. त्यामुळे किंमत किती आणि दरवर्षी ती किती वाढणार याची कसलीच चर्चा उद्भवत नाही. भविष्यकाळातही सुमोपेंट विनामूल्यच राहणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सुमोपेंट अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललं आहे. सुमोपेंट इंटरनेटवर थेट उघडत असलं तरी बर्‍यापैकी फास्ट आहे. त्यात तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कवरील इमेज किंवा फोटो उघडू शकता. तुमचा फोटो क्रॉप करणं, तो लहान-मोठा, उभा-आडवा (रोटेट), उलटा सुलटा (फ्लीप) करणं, लेयर्समध्ये काम करणं, शार्पन, ब्लर, एम्बॉस, ग्लो करणं हे सारं त्यात आहेच. पण अनेकविध फिल्टर्सही त्यात उपलब्ध आहेत. फोटोशॉपसारखी तीस पेक्षा अधिक टूल्स त्यात दिली आहेत. 
विविध ब्रशेस, इफेक्टसची जोड त्यांना आहे. बेव्हेल, ग्रॅडीयंट, शॅडोजची व्यवस्था त्यात आहे. सिलेक्शन टेक्नीक्स, फेदर इफेक्ट, अल्फा लेयर, ब्राईटनेस, काँट्रास्ट, ह्यू, सॅच्युरेशन हे सगळंही त्यात आहे. मुख्य म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे हे सगळं मिळविण्यासाठी तुम्हाला करायचं काहीच नसतं. तुम्ही फक्त सुमोपेंट डॉट कॉम /अॅप ह्या साईटवर जायचं. इतकच. 
      ज्या देशात लिनक्स ही ऑपरेटींग सिस्टम तयार झाली त्या फिनलंड ह्या देशात हा सुमोपेंट तयार झाला आहे. सध्या त्याची ०.८ ही बाल्यावस्थेतील आवृत्ती नेटवर आहे. डिसेंबर २००८ अखेरीपर्यंत १.० ह्या पूर्ण आवृत्तीत तो प्रवेश करील अशी अपेक्षा आहे. फोटोशॉपमध्ये असलेल्या अनेक गोष्टी आज सुमोपेंट मध्ये नाहीत हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने सुमोपेंट विकसित होतो आहे, तो पाहता त्याच्या पुढल्या आवृत्त्या फोटोशॉपच्या जवळ जवळ जात राहतील असं निश्चितपणे वाटतं. सुमोपेंट मध्ये तुमच्या फोटोवर काम करून झालं की त्या कामासकट तुमचा फोटो तुमच्या हार्ड डिस्कवर तुम्हाला सेव्हही करता येतो. किंवा, हवं तर सुमोपेंटच्या साईटवरच तो सेव्ह करून ठेवण्याची सोयही आहे. एवढं सारं असून फोटोशॉपच्या तुलनेत सुमोपेंट वापरायला फार सोपा आहे. लहान मुलांना ह्या साईटवर सोडलत तर काही काळात ती त्यात एवढी रमून जातात की निरर्थक गेम्सकडे त्यांचे लक्षही जात नाही असा अनुभव आहे. 
सुमोपेंटसारख्या दुसर्‍या साईटस म्हणजे www.picnik.com आणि www.fotoflexer.com. ह्यातील पिकनिक डॉट कॉम गेली काही वर्षे नेटवर आहे. त्यामुळे ती चांगली विकसितही आहे आणि सुमोपेंटच्या तुलनेत थोरल्या भावासारखी आहे. पण तरीही ह्या मोफत उपलब्ध असणार्‍या तिन्ही साईटसमध्ये मला प्रभावित करते ती सुमोपेंट.  मुद्दा अगदी सरळ आहे. सुमोपेंट विनामूल्य आहे. तो इन्स्टॉल करावा लागत नाही. असं असूनही तो खूप काही देतो. तो मनोरंजनही करतो. तुमच्या फोटोवर काम करण्याचं कामही तो करतो. तुमची हार्ड डिस्कची जागाही तो मागत नाही. तुमची मेमरीही तो खात नाही. वेगाने चालतो. इंटरनेट अॅप्स आता वयात येत चालली आहेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमोपेंट. भविष्यकाळात विंडोज किंवा लिनक्ससारखी संपूर्ण ऑपरेटींग सिस्टम, संपूर्ण एम.एस. ऑफिससारखा सूट आणि आपल्याला संगणकावर लागणारं सगळच इंटरनेटवर तयार मिळणार आहे असे संकेत ह्या सार्‍यातून मिळत आहेत. एकूणच संगणक जगतातील तंत्रज्ञानाचा वेग क्षणाक्षणाला वाढत चालला आहे, यात शंका नाही. 

No comments:

Post a Comment