Sunday, 12 July 2015

एसएसमएसचे जनक मॅटी मॅकोनन

आजचे 21 वे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यात भारतातचा जर विचार करावयाचा झाला तर कोट्यावधी जनतेकडे आज स्मार्टफोन आहेत. आता सोशल नेटवर्किंग साईट व व्हॉटस्अप आले ती गोष्ट वेगळी परंतु 5 ते 10 वर्षापूर्वी एसएमएसची चलती होती.  परंतु या एसएमएसचा शोध लावला कुणी ? आपण हा विचार करत नाही  हा प्रश्‍न एकालाही पडला नसावा असे वाटते. प्रत्येक मोबाइलधारकाच्या बोटांना नवीन भाषा प्रदान करणारे एसएमएसचे जनक आणि फिनलँडचे ज्येष्ठ तंत्रज्ञ मॅटी मॅकोनन यांनी मानवजातीची भाषाच बदलून टाकली. डिजिटल युगातील नवीन संवाद माध्यमांसाठी स्वतंत्र शब्दभांडारच त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांनी दिलेल्या तंत्रज्ञानिक क्षमतेचा वापर तरुणांनी आपल्या स्वतंत्र शब्दनिर्मितीसाठी केला तर जुनी पिढीही त्यात सहज संवाद साधू लागली. 
मोबाईलवर एस. एम. एस. द्वारे जगाच्या कानाकोपर्‍यात क्षणार्धात संदेश पाठवता येतो. दररोज अब्जावधी लोक एस.एम.एस.ची देवाणघेवाण करतात. भाषा, देश, प्रांताच्या पलीकडे जाऊन केवळ एस.एम.एस.द्वारे आपला संदेश पोहोचवता येतो. गेल्या काही वर्षात याच यंत्रणेचा  विस्तार झाला. मोबाईलवरून छायाचित्रे आणि अन्य मजकूरही पाठवायची सुविधा उपलब्ध झाली. केवळ बोटांच्याद्वारे नवी भाषा विकसित आणि मानव जातीला द्यायचे श्रेय मॅटी मॅकोनन यांचे आहे. या तंत्राचे जनक आणि प्रणेतेही तेच. फिनलँडचे ज्येष्ठ तंत्रज्ञ मॅकोनन यांनी शोधून काढलेल्या या नव्या तंत्रामुळे जगातल्या संचार यंत्रणेला नवी दिशा मिळाली. या क्षेत्रात आमूलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाले. 20 व्या शतकाचे शेवटचे दशक दूरसंचार क्रांतीचे गणले गेले.
फिनलँडमधल्या सोमूसाल्मी या भागात जन्मलेल्या मॅकोनन यांनी 1976 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी घेतली. एन. एम.टी. मोबाईल कंपनीत नोकरीस असताना त्यांनी पहिला पूर्णपणे स्वयंचलित सेल्युलर फोन तयार करण्यात यश मिळवले. हे फोन पहिल्या पिढीतले आणि प्रायोगिक होते. त्यात डिजिटल तंत्रज्ञान नव्हते. मोबाईलच्या तंत्रात सुधारणा घडवण्याबरोबरच मॅकोनन ग्लोबल सिस्टीम मोबाईल कम्युनिकेशन, तंत्रज्ञानाचा प्रगत अभ्यास आणि संशोधन करीत होते. त्या काळात फिनलँडमधली  नोकिया’ ही मोबाईल उत्पादन करणारी कंपनी जगात आघाडीवर होती. जगातल्या बाजारपेठेत याच कंपनीच्या मोबाईलचा दबदबा होता. याच कंपनीत नोकरी करीत असताना मॅकोनन यांनी  शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस’ हे नवे तंत्रज्ञान विकसित केले. असे काही नवे तंत्र अंमलात येईल, असे जगाने स्वप्नातही पाहिले नव्हते. 
1994 मधल्या सुधारित मोबाईलमध्ये नोकियाने ही सुविधा दिली आणि जगाच्या संवादाची भाषाच पूर्णपणे बदलून गेली. त्या आधी पोस्टातल्या तार कचेरीद्वारे परस्प रांना महत्त्वाचे संदेश पाठवले जात. त्या काळात मोबाईलचा प्रसारही एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभर झालेला नव्हता. अमेरिका, इंग्लंड, जपान आणि अन्य प्रगत राष्ट्रातच मोबाईल वापरणार्‍यांची संख्या प्रचंड होती. पुढे विसाव्या शतकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मोबाईल यंत्रणेचा विस्तार अविकसित राष्ट्रातही झाला. नव्या कंपन्या अनेक नव्या तंत्रज्ञानाच्या सुविधांसह बाजारात उतरल्या. एस. एम. एस. चे तंत्र अधिकच सुधारित झाले. तार यंत्रे अडगळीत पडली. तार कचेर्‍याही बंद झाल्या. सारे जग मॅकोनन यांच्या शोधामुळे जवळ आले. एस. एम. एस.च्या शोधाला 20 वर्षे पूर्ण झाली तेव्हा मॅकोनन यांनी अत्यंत विनम्रपणे या शोधाचे श्रेय नोकिया कंपनीला दिले. या कंपनीतल्या तंत्रज्ञ सहकार्‍यांच्यामुळेच आपल्याला हे तंत्रज्ञान विकसित करता आले, असे ते सांगत असत. एस. एम. एस. च्या शोधामुळेच मोबाईलद्वारे संवादाबरोबरच छायाचित्रे, संगीत आणि अन्य मजकूरही पाठवायची -स्वीकारायची सुविधा सध्या उपलब्ध झाली आहे. जगाला नव्या संचार क्रांतीत नेणारे मॅकोनन यांचे अलीकडेच वयाच्या अवघ्या 63 व्या वर्षी निधन झाले. 

No comments:

Post a Comment