Wednesday, 1 June 2016

'बारकोड’ म्हणजे काय?

    आपण मोठमोठे मॉल, किंवा इतर ठिकाणे जसे की सुपरमार्केट, तसेच काही दुकानाच्या बिलिंग काऊंटरवर बसलेला माणूस आपण खरेदी केलेल्या वस्तूंवरील बारकोड स्कॅनरच्या मदतीने बारकोड स्कॅन करून क्षणचाही विलंब न लावता पटापट बिल बनवतो. आता सर्वच क्षेत्रातील किरकोळ वस्तूवरही बारकोडचा वापर सर्रास केला जातो. या बारकोडमुळे वेळेची बचत तर होतेच पण कामातही अचुकता येते. 
बर्याच जणांना प्रश्न पडतोही की बारकोड म्हणजे नेमके काय असते ? फक्त बारकोड हा वस्तूवर असतो त्यात वस्तूच्या किमती लपलेल्या असतात एवढी तोडकीच माहिती समोरच्या असते परंतु आज मी तुम्हाला येथे बारकोडविषयी सविस्तर माहिती देणार आहे.
     ‘बारकोड’ म्हणजे वेगवेगळी रुंदी व अंतर असलेल्या समांतर रेषांचा मर्यादित आकाराचा एक समुह असतो. हे समुह दोन प्रकारचे असतात.
त्यातला पहिला समुह हा 1D बारकोड नावाने ओळखला जातो या समुहात फक्त समांतर रेषांचा वापर केला जातो. 


दुसरा म्हणजे 2D बारकोड नावाचा असतो. या बारकोडमध्ये चौरस किंवा आयताकृती रचना असून त्यात २डी चिन्हे किंवा भूमितीय आकारांचा वापर केला जातो. या बारकोडमध्ये वस्तूबद्दलची सविस्तर माहिती जसे उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर, पॅकिंग तारीख, एक्सपायरी डेट आदी प्रकारची माहिती साठवलेली असते. यामुळे वितरण, साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रमणा यांचा मागोवा घेणे दुकानदारांना व कामगारांना सुलभ होते.
      बारकोडचा जन्म हा अमेरीकेत 1973 साली झाला. या बारकोडची संकल्पना मि.बर्नाड सिल्व्हर आणि मि. नॉर्मन वूडलॅड यांना समुद्रकिना-यावरील वाळूत रेघोटया ओढताना सुचली. 1973 मध्ये अमेरिकेतील प्रमुख उद्योजकांनी एकत्र येऊन उत्पादन ओळख करण्यासाठी एकच मानक असावे असे ठरविले. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात आला.  नंतर जून 1974 साली रिग्लेज च्युईंग गमच्या पाकिटावर सर्वात अगोदर बारकोडचा वापर करण्यात आला. अमेरिकेत रिटेल वस्तूंसाठी UPC-A (युनिफॉर्म प्रॉडक्ट कोड) या कोडचा वापर केला जातो. यात 12 अंक दिलेले असतात. कोणत्याही देशाचा काहीही संदर्भ दिला जात नाही. युरोप व इतर देशांमध्ये EAN-13 (युरोपियन आर्टकिल नंबरिंग) हा कोड वापरला जातो. यात 13 अंक असतात व देशाच्या कोडचा अंतर्भाव केलेला असतो.
       बारकोडमधील पहिले 2 किंवा 3 अंक हे उत्पादकाने कोणत्या अधिकृत देशामध्ये (GS1 समितीचा सभासद) उत्पादन /वस्तूचा कोड नोंदणी केलेला आहे याची माहिती कळते. म्हणजेच बारकोडमधील पहिल्या तीन अंकांवरून तो पदार्थ /वस्तू कुठे तयार केली गेली आहे याची माहिती मिळत नाही, याची कृपया सर्वानी नोंद घ्यावी. तर त्या उत्पादनाची नोंदणी कुठे केलेली आहे ही माहिती मिळते. बारकोडवरील डावीकडचे पहिले 5 अंक उत्पादकाची ओळख देतात व सगळ्यात उजवीकडचे 5 अंक उत्पादन कोडची माहिती देतात. 1990 साली अमेरिका व इतर आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र येऊन जागतिक स्तरावर EAN-UPC ही संघटना स्थापन केली. GTIN म्हणजेच ‘ग्लोबल ट्रेड आयटम नंबर’ या संघटनेने विकसित केला. हा क्रमांक 8,12,13 किंवा 14 अंकी असतो.
      1991 मध्ये GS1 डेटाबार तयार केला. त्याचे वैशिष्टय़ असे की, बारकोडपेक्षा तो आकाराने लहान असूनसुद्धा अधिक माहिती संकलित करतो.  2005 मध्ये या संघटनेचे GS1 (ग्लोबल स्टँडर्स वन) असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या संघटनेकडून घेतलेल्या अधिकृत कोडला GS1 कोड असेही म्हणतात.
GS1 बारकोड हे जागतिक स्तरावरील सर्वात सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त बारकोड आहेत. भारताने 1996 मध्ये GS1चे अधिकृत सभासदत्व घेऊन GS1 इंडियाची स्थापना केली. GS1 ही ना नफा ना तोटा सहकारी तत्त्वावर उद्योजकांनी चालविलेली जागतिक अधिकृत संघटना आहे. त्यांचे मुख्य ऑफिस ब्रसेल्स, बेल्जियम व प्रिस्टन, न्यूजर्सी येथे आहे. आज जगातील  100 पेक्षा जास्त देश त्यांचे सभासद आहेत. गेल्या 30 वर्षापासून GS1 जागतिक मानकांची निर्मिती व त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वितरण साखळीतील वापर यावर काम करत आहे. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत.
       जेव्हा आपण इतर देशांमधून आयात केलेली फळे विकत घेतो, तेव्हा त्या प्रत्येक फळावर स्टीकर लावलेला असतो. (उदा. सफरचंद, पेर, किवी, ड्रॅगन फ्रूट आदी). या स्टीकरला PLU Code किंवा प्राईस लुक अप क्रमांक म्हणतात. त्यातून आपल्याला त्याबद्दलची खालील माहिती मिळू शकते.
1) 4 अंकी कोड असेल तर ते उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने कीटकनाशकांचा वापर करून उत्पादित केलेले असते.
2) कोडमधील शेवटची 4 अक्षरे ते कोणत्या प्रकारचे फळ आहे ते दर्शवितात (उदा. केळे, 4011)
3) जर कोड क्रमांक 5 अंकी असेल व तो ‘8’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते फळ किंवा भाजी जनुकीय संरचना बदलून उत्पादित केलेले असते.
4) जर 5 अंकी कोड ‘9’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते सेंद्रिय पद्धतीने केलेले उत्पादन असते. स्टीकरसाठी वापरला जाणारा गम फूडग्रेडचा असतो. परंतु या सगळ्यातील खरी खुबी अशी आहे की, अमेरिकेत असे स्टीकर लावणे कायद्याने बंधनकारक नाही. तसेच जनुकीय संरचना बदलून केलेल्या उत्पादनाला अधिकृतरीत्या पारंपरिक उत्पादनच म्हटले जाते. बारकोड हा त्या उत्पादनाच्या वितरण साखळीचा (उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत) अविभाज्य घटक झाला आहे. हे GS1 हे जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करून देता येते. बारकोडचे उत्पादकासाठी अनेकविध फायदे आहेत ते असे.
1. माहितीचे अचूक व जलद संकलन केले जाते.
2. उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही)
3. वेळेची बचत होते.
4. कमी मनुष्यबळ लागते.
5. कमीत कमी चुका, त्रुटी कामात अचुकता साधली जाते.

 सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बारकोड हा कायदेशीरदृष्टया सर्वांना बंधनकारक नाही. वस्तूंच्या उत्पादकांनी उत्पादनाचे वितरण साखळीतील सुलभरित्या ट्रॅकिंग करण्यासाठी निर्माण केलेली ही एक खासगी असली तरीही जागतिक स्तरावर अधिकृत मानक असलेली यंत्रणा आहे. कारकोडमुळे कामात अचुकता असल्याने बारकोडचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे.

No comments:

Post a Comment